लातूर : प्रतिनिधी
राज्यात खाजगी साखर उद्योगात मराठवाडा, विदर्भ विभागात नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा सीमेवर असलेल्या भागात आर्थिक क्रांती घडवून आणलेल्या मांजरा परिवारातील लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रिजने चालू गळीप हंगामात दररोज सरासरी ४ हजार या प्रमाणे उसाचे गाळप करीत २९ नोव्हेंबर अखेर १ लाख ०१ हजार ८२० मेट्रिक टन उसाचे यशस्वीपणे गाळप केले असून गाळपात उच्चांक व अधिक भाव देणा-या जागृती शुगरने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.
चालू गाळप हंगामात जागृती शुगर इंडस्ट्रिजकडून को-जनरेशनच्या माध्यमातून ३५,७४,८०० वीजनिर्मिती केली असून ती महावितरण कंपनीला निर्यात केली आहे तर इथेनॉल २,१४,२०९ लिटर उत्पादन करण्यात आले आहे. त्याचबरोबर डिस्टलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहे. राज्याचे माजी मंत्री, सहकारमहर्षि तथा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या अध्यक्षा तथा कार्यकारी संचालक सौ. गौरवी अतुल भोसले-देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चालू हंगामात कारखान्याने अतिशय काटेकोरपणे नियोजन करून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांचा वेळेवर ऊस गाळप करण्यासाठी यंत्रणा कार्यरत असून नियमाप्रमाणे सर्वांचा ऊस गाळपास जात असल्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांनी या वेळी बोलताना सांगितले.