रत्नागिरी : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणुका पार पडल्या आहेत. आता या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. सध्या अनेक मतदारसंघातील कौल समोर आला आहे. महाराष्ट्रामध्ये कोणाचे सरकार येणार याचा अंदाजही एक्झिट पोलने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश एक्झिट पोलने महायुतीच्या विजयाचे भाकीत केले आहे. त्यात आता राज्यातील बहुतांश जागी महायुतीच आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
मतमोजणीपूर्वी बैठकांची फेरी सुरू आहे. महाराष्ट्रातील निवडणूक निकालापूर्वीच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सध्या अजित पवार गटाच्या आदिती तटकरे, विजय कालिदास कोळंबकर, मंगलप्रभात लोढा आणि गिरीश महाजन हेदेखील विजयी झाले आहेत. याशिवाय, देवेंद्र फडवणीसही त्यांच्या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
महाराष्ट्र निवडणुकीत भाजपने सर्वाधिक १५२ जागा लढवल्या आहेत. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत मौन बाळगल्याचे दिसून आले होते. तर भाजपच्या होर्डिंग्जवर २०२२ मध्ये उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागलेल्या फडणवीसांची छायाचित्रे ठळकपणे दिसून आली. अशा स्थितीत विजयानंतर महाआघाडीत मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.