17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रनव्या उत्साहाने लोकांसमोर जाणार

नव्या उत्साहाने लोकांसमोर जाणार

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा भरघोस यश मिळाले आहे. महायुतीला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले असताना महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. महायुतीला २३४ जागा मिळाल्या असून भाजपाला १३२, शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादी ४१ जागा जिंकली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त ५० जागा मिळाल्या असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त २० जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला १६ आणि राष्ट्रवादीला १० जागा जिंकता आल्या. दरम्यान शरद पवारांनी साता-यात पत्रकार परिषद घेत त्यांनी या निकालावर भाष्य केले आहे.

आमची जी अपेक्षा होती तसा निकाल नाही. पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे. त्याचा अभ्यास करणे, कारणीमांसा करणे याची गरज आहे. नव्या उत्साहाने लोकांमध्ये जाऊन उभे राहावे लागेल असें शरद पवार म्हणाले आहेत. महायुतीला लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला का? असे विचारले असता शरद पवार म्हणाले की आम्ही लोकांकडून, कार्यकर्त्यांकडून जी माहिती घेतली त्यातून हे एक महत्त्वाचे कारण आहे असे ऐकायला मिळत आहे. आम्ही सत्तेत नसलो तर पैसे देणे बंद होईल असे सांगण्यात आले. महिलांचे मतदान वाढले आहे असे आताच्या आकडेवारीवरुन दिसत आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारची भूमिका जनतेने घेतली होती, तशी आता घेतली नाही. सर्वांनी कष्ट केले पण निकाल हवा तसा लागला नाही अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली. तसेच ईव्हीएम आणि पैशांच्या आरोपांवर त्यांनी भाष्य करणे टाळले. मी काही सहका-यांचे मत ऐकले आहे, पण अधिकृत माहिती येत नाही तोर्यंत त्यावर भाष्य करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

बटेंगें तो कटेंगे यामुळे ध्रुवीकरण झाले. योगींनी केलेल्या विधानामागे मतांचे ध्रुवीकरण व्हावे असा दृष्टीकोन होता. धार्मिक बाजू देण्याचा प्रयत्न काही जणांनी केला त्यामुळे हे झाले असे दिसत आहे असेही शरद पवारांनी सांगितले. राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडून आला नाही असे सांगण्यात आले असता ते म्हणाले की, त्यांचा एकही आला नाही आणि आमचेही फक्त १० आले. या निवडणुकीत आम्हालाही इतक्या कमी जागा मिळतील असे त्यांनाही वाटत नव्हते.

आम्हा लोकांची पिढी आहे त्यांच्यावर चव्हाणांचे संस्कार आहेत. त्यांचे विचार आम्ही मानतो. त्या विचाराने काम करणारे लोक त्याच्यातील मोठा वर्ग हा भाजपा आणि इतरांसह गेला आहे ही वस्तुस्थिती आहे. या निवडणुकीत त्यांना यश मिळाले आहे. पण त्यांची पार्श्वभूमी पाहिली तर यशवंतराव चव्हणांच्या विचारावर काम करत होते हे नाकारता येत नाही. यशवंतराव चव्हाण यांनी कधीही त्या काळात जनसंघ आणि आताचा भाजपा यांच्यासह चर्चा केली नाही. वैचारिक अतंर हे ठेवले होते असे शरद पवारांनी सांगितले.

बारामतीत कोणीतरी उभं राहायला हवे होते. जर उमेदवार दिला नसता तर महाराष्ट्रात काय संदेश गेला असता. कोणीतरी निवडणूक लढण्याची गरज होती. अजित पवार आणि युगेंद्र पवार यांची तुलना होऊ शकत नाही याची आम्हाला कल्पना होती. अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासूनचे राजकारण, सत्तेतील स्थान आणि नवखा तरुण एका बाजूला याची आम्हाला जाणीव होती असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.

एखादा घरी बसला असता. मी काही घरी बसणार नाही. मी पुन्हा एकदा जोमाने, कतृत्वाने संघटना उभी करण्यासाठी दौरा करत आहे असा निर्धार शरद पवारांनी व्यक्त केला आहे. उद्या विजयी उमेदवारांची बैठक होणार आहे आणि परवा सर्व उमेदवार यांची जयंत पाटील यांच्या अध्यक्षते खाली बैठक होणार आहे त्याला मी ही उपस्थित राहणार आहे.

संसदीय अधिवेशन सुरू असल्याने शपथविधीला उपस्थित राहता येणार नाही. सरकार अजून बनलेलं नाही, त्यामुळे त्यांच्याकडून आताच अपेक्षा ठेवणं योग्य नाही. महाराष्ट्राचा नावलौकिक कमी होता कामा नये असे मत त्यांनी मांडले. मतदारापर्यंत काय काय पोहचवले जाते आहे त्याचा अभ्यास करावा लागेल. व्होट जिहाद मुळे धार्मिक ध्रुवीकरण करण्यात आल्याचे म्हणायला वाव आहे असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR