मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच राज्याच्या माजी पोलिस महासंचालिका रश्मी शुक्ला यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने त्यांना पदमुक्त केले होते. त्यानंतर आता महायुतीचे सरकार येणार हे स्पष्ट झाल्यानंतर शुक्ला या फडणवीसांच्या भेटीला गेल्या. काँग्रेस आणि इतर विरोधी नेत्यांचा फोन टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्लांवर करण्यात आला होता.
देवेंद्र फडणवीस हे या आधी राज्याचे गृहमंत्री होते. आताही मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे नाव चर्चेत आहे. तसेच गृहखातेही त्यांच्याकडेच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी मिळावी किंवा इतर कोणतीही मोठी जबाबदारी मिळावी, यासाठी रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे.
रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप असल्यामुळे निवडणुकीच्यावेळी त्यांना पदमुक्त करण्यात आले होते. काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला होता. २०१४ ते २०१९ या काळात रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह अनेक जणांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.