लातूर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणा-या विद्यार्थ्याचे शिक्षणाच्या बरोबरच क्रीडा गुण विकसीत व्हावेत. ग्रामीण भागात क्रीडांगण विकसीत करताना रोजगारही उपलब्ध झाला पाहिजे. या संकल्पनेतून मुख्यकार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी रोहयो आणि शिक्षण विभाग यांच्या समन्वय घडवून गेल्या तीन-चार महिण्यात २८ शाळांची क्रिडांगणे विकसीत केले आहेत. या नविन क्रीडांगणावर नुकत्याच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाही पार पडल्या आहेत.
युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या पंचायत युवा क्रीडा व खेल अभियान (पायका) योजनेतंगर्त फूटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो खेळासाठी नियोजन पूर्वक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत क्रीडांगण तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ९९ शाळेचे प्रस्ताव आले होते. प्रस्तावांच्या छाणनीअंती १२४ शाळांना क्रीडांगण तयार करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले. जिल्हा क्रीडा विभागाने १२२ जिल्हा परिषदेच्या शाळांना क्रीडांगण तयार करण्यासाठी तांत्रीक मान्यता दिली आहे. तर ११५ शाळांच्या क्रीडांगणांना गटविकास अधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता दिली असून ११३ जिल्हा परिषद शाळांना कार्यारंभ आदेश दिला आहे.
जिल्हयातील ९९ जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरात १० हजार स्केअर फूट जागेत रोहयो आणि शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून क्रीडांगण विकसीत करण्याचे काम सुरू आसून २८ जि. प. शाळांचे क्रीडांगण विकसीत झाले आहेत. तर ६१ शाळेत कामे प्रगतीपथावर आहेत. तर १४ शाळांनी अद्याप क्रिडांगण विकासीत करण्याच्या कामाला सुरूवातच केली नाही. विधानसभा निवडणूक संपल्यामुळे या ठिकाणची कामे सुरू होण्याची आपेक्षा आहे.