मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी आवश्यक असलेले १० टक्के संख्याबळ मिळालेले नाही. मात्र संख्याबळ नसतानाही या पूर्वी विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते व त्या परंपरेचे पालन करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी केली आहे. या बाबतचे एक पत्रही आज विधिमंडळ सचिवालयाला देण्यात आले.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला एक दशांश आमदार नसल्याने विरोधी पक्षनेतेपदावरून पेच निर्माण झाला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडे २०, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे १० आणि काँग्रेसकडे १६ आमदार असल्याने नियमानुसार कोणत्याच पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता नाही. लोकसभेतही २०१४ आणि २०१९ मध्ये पुरेसे संख्याबळ नसल्याने काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद नाकारण्यात आले होते. हाच दाखला देऊन विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद नाकारले जाण्याची शक्यता आहे.
ही शक्यता गृहीत धरून शिवसेनेचे गटनेते व प्रतोद भास्कर जाधव व सुनील प्रभू यांनी आज विधिमंडळ सचिवालयाला पत्र दिले. संख्याबळ नसतानाही १९८६ मध्ये जनता पक्ष आणि शेकापला विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते. सरकारकडे पाशवी बहुमत म्हणून अहंकार न ठेवता महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा राखली जावी, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.