मुंबई : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा महासंघाने याबाबत राज्यातील निवडून आलेल्या आमदारांचा अभ्यास करून यांची आकडेवारी जाहीर केली आहे. यावेळी निवडून आलेले ११२ आमदार हे मराठा, मराठा-कुणबी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत राज्यात मराठा आंदोलनाची मोठी धग होती.
लोकसभेत जरांगे फॅक्टर चालल्यानंतर विधानसभेत जरांगे फॅक्टर चालणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मराठवाड्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी १३-१४ महिने आंदोलन केले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे मराठा आंदोलन हे प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू होते.
विधानसभा निवडणुकीत बहुसंख्य उमेदवार हे मराठा होते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष सामाजिक कार्यकर्त्यांना विचारून घेऊन ही या आमदारांची संख्या कन्फर्म केली आहे. मागील विधानसभेमध्ये मराठा, मराठा कुणबी ११८ आमदार होते. (कुणबीमध्ये ५५ कुणबी प्रकार आहेत. त्यातील फक्त मराठा समाजाशी सोयरिकी होतात ते फक्त मोजले आहेत.) यावेळी ११२ आमदार आहेत, असे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. राज्यात अनुसूचित जाती-जमातीसाठी ५४ मतदारसंघ राखीव आहेत.
महाविकास आघाडी आणि महायुतीनेही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली. मराठवाड्यातून निम्म्याहून अधिक मराठा समाजाचे आमदार निवडून आले आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणा-यांना पाडा असा संदेश मनोज जरांगे यांनी दिला होता, त्यांच्या आवाहनाला मराठवाड्यातील मराठा समाजाने गांभीर्याने घेतलेले दिसत नाही.