मुंबई : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनाच्या निमित्ताने ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता यासारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना देण्यात येतो.
यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी लेखक, दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांची निवड करण्यात आली आहे. नागराज मंजुळे यांचे नाव मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत अग्रक्रमाने घेतले जाते. नागराज मंजुळे हे एक दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते, पटकथा लेखक, कवी आहेत, ज्यांनी एकापेक्षा एक कलाकृती भारतीय चित्रपटसृष्टीला दिल्या आहेत.
त्यांना वास्तववादी लेखन, दिग्दर्शन आणि चित्रपटनिर्मिती करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. आजवर त्यांना अनेक नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी आपल्या कार्यातून महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा सामाजिक वारसा विकसित केला. त्यांनी केलेल्या अलौकिक कार्याची दखल घेत त्यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सन २०२४ चा मानाचा ‘समता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येत आहे. येत्या २८ नोव्हेंबर रोजी फुले वाड्यात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.