मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. महायुतीतील घटक पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी चढाओढ सुरू असताना आता मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक सुनील नागणे यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असावेत, अशी भूमिका मांडली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहून महायुतीला मतदान केले. त्यामुळे महायुतीचा राज्यभरात दणदणीत विजय झाला. राज्यात सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाण्यासाठी मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असायला हवेत, असे मराठा ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक म्हणाले.
तर दुसरीकडे मराठा महासंघाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी पसंती देत पाठिंबा दिला आहे. जरांगे पाटलांचे आंदोलन व्यक्तीद्वेषाचे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कधी जातिभेद केला नाही आणि २ टक्के लोक काय जातिभेद करणार? असा सवालही मराठा महासंघाचे राष्ट्रीय सचिव संभाजी दहातोंडे यांनी केला आहे.