मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या बाजूने निकाल दिला आहे. महाविकास आघाडीला हा खूप मोठा धक्का आहे. काँग्रेसने काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकंदरीत विधानसभेचा अनुभव पाहता ठाकरेंची शिवसेना महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी स्वबळावर लढा देण्यासंदर्भात सूचक विधान केले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मविआला अपयश आल्याने स्वबळावर लढावे असे पक्षातील ब-याच जणांना वाटत असल्याने संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी असे करायला हवे, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
कार्यकर्त्यांचे म्हणणे नेतृत्वाने ऐकून घेतले आहे. लगेच त्यावर प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता नाही. इतकी घाई करायची आवश्यकता नाही, असे अंबादास दानवे म्हणाले. काल पराभूत उमेदवारांची ‘मातोश्री’वर बैठक झाली. पराभूत उमेदवारांनीच नव्हे तर विजयी उमेदवारांनीदेखील तक्रारी केल्या आहेत. अनेक तक्रारी आमच्याकडे येत आहेत, असे दानवे म्हणाले.
ईव्हीएमविरोधात जन आंदोलन गरजेचे
काही ठिकाणी मते कमी मोजली गेली. कुठे तरी पाणी मुरतेय. ईव्हीएममध्ये पाणी मुरत आहे. त्यामुळे ईव्हीएमविरोधात जन आंदोलन उभे राहण्याची गरज आहे. महाराष्ट्रात नाही तर देशात आंदोलन उभे राहण्याची गरज आहे. काही ठिकाणी मतपेट्या उघड्या आल्या त्याबद्दल निवडणूक आयोगाने बोलले पाहिजे, असे ते म्हणाले.