सोलापूर : मजरेवाडी परिसरातील जागेची मोजणी करताना सातबारा उताऱ्यावर नावे असलेल्या व्यक्तींना न बोलवताच भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक नितीन सावंत व कार्यालयातील तबस्सुम सय्यद, मुकुंद काडगावकर आणि श्रीशैल काळे यांनी जागेची परस्पर मोजणी केली.
त्या सातबारा उताऱ्याचे पोटहिस्से तयार करून त्यांनी अधिकाराचा गैरवापर करून फसविल्याची फिर्याद सुनील वसंतराव पोतदार (रा. शुक्रवार पेठ) यांनी सदर बझार पोलिसांत दिली आहे. त्यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागातील मजरेवाडी परिसरातील बिनशेती खुली जागा सर्व्हे नंबर ३०६/१ यात नवीन सर्व्हे नंबर १५४/१ याचे एकूण क्षेत्र चार हेक्टर ७६ आर. एवढे आहे. या मिळकतीवर फिर्यादी सुनील वसंतराव पोतदार व त्यांचे पाच चुलत भावांची वारसाहक्काने नावे लागली आहेत.
सातबारा उताऱ्यावरील नावे कमी का झाली नाहीत याची खातरजमा न करताच त्या जागेची भूमिअभिलेख कार्यालयातील शासकीय अधिकाऱ्यांनी मोजणी केली. अर्जदारास व उताऱ्यावरील कोणालाही त्याची कल्पना किंवा नोटीस देण्यात आली नाही. त्यांच्या परस्परच उताऱ्यावरील नावे असलेल्यांना माहिती न देताच जागेची मोजणी करण्यात आली. त्या मिळकतीच्या सातबारा उताऱ्याचे पोटहिस्से तयार करून चौघांनी अधिकाराचा गैरवापर करून अन्य मिळकतदारांना फायदा करून दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे करीत आहेत.
शहर उत्तरच्या भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक नितीन सावंत यांच्या नेतृत्वात तबस्सुम सय्यद, मुकुंद काडगावकर आणि श्रीशैल काळे यांनी मूळ मालकाच्या परस्पर किंवा कोणतीही नोटीस न देताच त्या जागेची मोजणी करून नकाशा तयार केला. उताऱ्याचे पोटहिस्से देखील केले. चिंतेची बाब म्हणजे त्या मोजणीवेळी जो उपस्थित होता म्हटले आहे, त्यांचे निधन मोजणीपूर्वी काही महिन्यांपूर्वीच झालेले आहे, असेही फिर्यादीने कागदपत्रांसह पोलिसांना सांगितले. याशिवाय याच परिसरातील अनेक प्रकरणे सदर बझार पोलिसांत दाखल असून त्याचाही तपास सुरू आहे.