सोलापूर: यंदा दिवाळी संपल्यावर हुडहुडी वाढत आहे. यामुळे तापमानाचा पारा खूप खाली घसरत आहे. या थंडीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. तर हुडहुडी भरवणारी थंडी तुरीसह गहू पिकासाठी – लाभदायी ठरणार आहे. मात्र, ती आणखी कमी झाल्यास – ज्वारीसह नुकतेच लागवड केलेल्या भाजीपाला पिकांच्या वाढीसाठी नुकसानकारक ठरू शकते.
पावसाने ओढ दिल्याने खरिपातील तूर संकटात सापडली होती. मात्र, नंतर पडलेल्या पावसाने तूर तग धरली असून सध्या शेंगा अवस्थेत आहे. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, जवस या पिकांची पेरणी सुरू आहे. गेल्या काही दिववसात तापमानाचा पारा खुपच खाली आला आहे.त्यामुळे थंडी वाढली आहे. वाढलेली ही थंडी तुरीसह गहू पिकाला वरदान ठरणार आहे.वाढती थंडी तूर पिकावरील किडीसाठी मारक ठरणार आहे.
ढगाळ वातारणामुळे तुरीवर किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. थंडीमुळे किडी नष्ट होणार असल्याने ते फायदेशीर ठरते. तर कमी तापमान गहू पिकाच्या वाढीला पोषक असते. त्यामुळे सध्या कमी झालेलेतापमान तूर, गव्हासाठी फायदेशीर ठरणार आहे. मात्र, ते आणखी कमी झाल्यास ज्वारी, भाजीपाला पिकांची वाढ मंदावू शकते, असे कृषीतज्ज्ञांनी सांगितले.
सध्या कमी झालेले तापमान तूर, गहू पिकासाठी उपयुक्त ठरणार आहे. थंडीमुळे तुरीवरील किडीचा प्रादुर्भाव कमी होणार आहे. तर १८ ते २२ अंश तापमान गहू पिकाच्या वाढीसाठी पूरक आहे. मात्र, तापमान १० अंशाच्या खाली आल्यास ज्वारी व भाजीपाल्याच्या नव्या पिकांच्या वाढीसाठी प्रतिकूल ठरणार आहे. असे कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालालासाहेब तांबडे यांनी सांगीतले.