तुळजापूर : एकीकडे महायुती सत्ता स्थापनेची जय्यत तयारी करत आहे. महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमविरोधातील लढा तीव्र करताना पाहायला मिळत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी तुळजापूर येथे जाऊन तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत साकडे घातले, अशी माहिती मिळाली आहे.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी सांगितले की, राजकारण हे आमचे क्षेत्र नाही. मुख्यमंत्री कोणीही झाले तर आरक्षण मात्र घेणारच आहोत. देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आघाडीवर असून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा आहे. तुमचा पाठिंबा कोणाला असेल? असा प्रश्न मनोज जरांगे यांना विचारण्यात आला. यावर, काही केले तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. लढावे लागणार आहे. आमचा चळवळीवर विश्वास आहे. कोणीही मुख्यमंत्री झाले, सरकार कुणाचे असले तरीही मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार, असा एल्गार मनोज जरांगे यांनी केला.
माझ्या गोर गरिबांच्या लेकराला न्याय मिळू दे, लढायला बळ मिळू दे, आरक्षण मिळू दे, आशीर्वाद मिळू दे, हेच मागणे तुळजाभवानी मातेकडे मागितले, अशी माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली. तसेच सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक उपोषणाला बसणार आहे. हे उपोषण अंतरवाली सराटीत किंवा मुंबईतही होऊ शकते, असे सूतोवाच मनोज जरांगे यांनी केले.