22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeसंपादकीयआली समीप घटिका!

आली समीप घटिका!

सुमारे आठवडाभर मुख्यमंत्रिपदावरून घोळ घातल्यानंतर आता राज्यात स्पष्ट बहुमत मिळालेल्या महायुती सरकारला नवीन सरकार स्थापनेच्या शपथविधीसाठी अखेर मुहूर्त मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी येत्या गुरुवारी, ५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर सायंकाळी ५ वाजता होणार आहे. शपथविधीसाठी एनडीएमधील प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्रात महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी निकालानंतर सात दिवसांनंतरही सरकार स्थापण्यात आलेले नाही. मंगळवारी (३ डिसेंबर) भाजपच्या गटनेता निवडीसाठी आमदारांची बैठक होणार आहे. भाजपचे निरीक्षक राज्यात येऊन गटनेत्याची निवड करणार आहेत. ५ डिसेंबरला नव्या सरकारमधील मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल.

या सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून एक आठवडा उलटल्यानंतरही महायुतीने सरकार स्थापनेचा दावा न केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महायुतीने राजभवनात जाऊन राजशिष्टाचाराप्रमाणे राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करणे गरजेचे होते. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती सरकारच्या शपथविधीची तारीखच जाहीर करून टाकली. शिवसेना, राष्ट्रवादीला अंधारात ठेवून हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महायुतीतही सारेकाही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी महायुती सरकारच्या शपथविधीची घोषणा परस्पर ‘एक्स’वरून करून टाकली. भाजपने अजून विधिमंडळ नेतेपदाची निवड केली नाही.

नवीन नेत्याने राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. तसेच राज्यपालांनी आपल्या घटनात्मक अधिकाराचा वापर करून शपथविधीसाठी नेत्याला औपचारिकपणे निमंत्रित केले नाही. तरीही ठिकाण आणि वेळ कोणी ठरवली असे अनेक प्रश्न बावनकुळे यांच्या घोषणेनंतर उपस्थित झाले आहेत. गुरुवारी रात्री दिल्लीत झालेल्या बैठकीनंतरही सरकार स्थापनेबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या डावपेचांबाबत सावधगिरी बाळगली आहे. ते नाराज असल्याचे बोलले जाते. म्हणूनच ते आपल्या गावी निघून गेल्याचे सांगितले जाते. मोठा निर्णय घेण्याआधी एकनाथ शिंदे आपल्या गावी जातात असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केल्याने ‘सस्पेन्स’ आणखी वाढला आहे. सध्या निर्माण झालेल्या तिढ्यावर मात करण्यासाठी भाजपने पुढे जाण्याचे धोरण ठेवले आहे. गुरुवारी कोण शपथ घेणार ते अजून निश्चित झालेले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्री शपथ घेणार का याबाबत मौन बाळगण्यात आले आहे. भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे सरकार स्थापनेबाबत चकार शब्द काढत नाहीत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, शंभुराज देसाई, भरत गोगावले यांनी मात्र एकनाथ शिंदे यांच्यासाठी गृहखात्याची मागणी केली आहे.

विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २३० जागा जिंकणा-या महायुतीचे घोडे मुख्यमंत्रिपदावरून अडले आहे. संघपरिवार व भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या नावावरून जोरदार संघर्ष सुरू असल्याचे बोलले जात आहे. फडणवीस यांच्यासाठी संघ परिवार हट्टाला पेटला आहे तर भाजपचे वरिष्ठ नेतृत्व ब्राह्मणेतर व्यक्तीसाठी (मराठा समाज) आग्रही असल्याची चर्चा आहे. त्यामुळे निकाल लागून आठवडा उलटला तरी मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. अनेक मुद्यांवर भाजपचे नेतृत्व आणि रा. स्व. संघ यांच्यात मतभेद आहेत. भाजपला आता संघाची गरज नाही असे जाहीर वक्तव्य भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले होते. आता राज्याच्या मुख्यमंत्री निवडीत होणारा विलंबही संघ-भाजपमधील मतभेदामुळे लांबल्याचे दिसून येत आहे. भाजपला १३२ जागा मिळाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी दावा केला. ही निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढवली गेली. राज्यात लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा मी शिल्पकार असल्याने हे यश मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असे शिंदे यांनी ठाणे येथील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनण्याला भाजपमधील दोन वरिष्ठ नेत्यांचा आक्षेप आहे. यावर संघाचा सवाल असा की, फडणवीस हे ब्राह्मण आहेत, २०१४ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी पाच वर्षांची आपली कारकीर्द पूर्ण केली होती. तेव्हा ते ब्राह्मण होते हे भाजपच्या नेतृत्वाला माहीत नव्हते का? भाजपचे नेतृत्व ‘ओव्हरस्मार्ट’ आहे. फडणवीस यांची निवड न करता आपण मुलखावेगळी कामगिरी करत आहोत असा भाजप नेतृत्वाचा समज आहे. वास्तविक पाहता त्यांच्या विचारांना कोणताही तर्क नाही. फडणवीस यांची क्षमता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे असे रा. स्व. संघाचे मत आहे. राज्यात मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटपावरून अद्याप तिन्ही पक्षांमध्ये सहमती झालेली नाही.

महायुती सरकारच्या रचनेबाबत अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गुरुवारी रात्री सुमारे तीन तास बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हेच असतील हे स्पष्ट करण्यात आले. मात्र पुण्यातील खासदार मुरलीधर मोहोळ, आमदार चंद्रकांत पाटील हे सुद्धा मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असू शकतात अशीही चर्चा आहे. त्यामुळे भाजप धक्कातंत्राचा वापर करणार का याकडे सा-यांचे लक्ष आहे. मुख्यमंत्रिपद तसेच खातेवाटपाचा फॉर्म्युला निश्चित न झाल्याने ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढविण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे गावी निघून गेले आहेत. तेथे ते आजारी पडले आहेत म्हणे. तेव्हा आता राज्याची काळजी राहिली बाजूला. मुख्यमंत्री शिंदे यांचीच काळजी घेण्याची वेळ आली आहे. असो. शपथविधी घटिका जवळ आली आहे. त्यासाठी तयार रहा!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR