मुंबई : प्रतिनिधी
अभिनेत्री रिंकू राजगुरूला ‘सैराट’ चित्रपटामुळे मोठे यश मिळाले. या चित्रपटाच्या यशानंतर तिने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले. यानंतर आता तिने नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘जिजाई’असे या चित्रपटाचे नाव आहे.
दरम्यान, नुकताच ‘जिजाई’ चित्रपटाच्या मुहूर्ताचा कार्यक्रम पार पडला. झी स्टुडिओज व कोकोनट फिल्म्स यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रिंकू राजगुरू हातात ‘जिजाई’ चित्रपटाच्या मुहूर्ताची पाटी घेऊन उभी असलेली दिसत आहे.
हा फोटो शेअर करत झी स्टुडिओजने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘शुभारंभ झाला, आता आपला आशीर्वाद असू द्या! झी स्टुडिओज व कोकोनट फिल्म घेऊन येत आहेत रिंकू राजगुरूची प्रमुख भूमिका असलेला, नवा कोरा मराठी सिनेमा जिजाई.’ या पोस्टमध्ये रिंकूला टॅग केले आहे.