लातूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेचा १५०० रुपयांचा हप्ता आचारसंहिता काळात बहिणींच्या खात्यात पडणे बंद झाले होते. आता निवडणुका आणि आचारसंहिताही संपल्याने डिसेंबर महिन्याचा हप्ता बँकेत जमा होण्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणी करू लागल्या आहेत. दरम्यान, पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा करतानाच लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल होण्याच्या शक्यतेने बहिणी चिंताग्रस्त झाल्याचेही दिसत आहे.
उत्पन्नाची अट पुन्हा लागू होऊन या योजनेला चाळणी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने लाडक्या बहिणींची ही चिंता वाढल्याचे दिसते. लाडकी बहीण योजना निवडणुकीपूर्वी राबविताना निकषांची काटेकोर छाननी करण्यात आली नव्हती. एका कुटुंबात दोनच महिलांना लाभाचा निकष असतानाही त्यापेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आला. घरात चारचाकी वाहन, आयकर भरणारे यांनाही योजनेचा लाभ घेता येत नव्हता, तरीही अशा कुटुंबांतील महिलांच्या खात्यांवर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा महिन्यांत प्रत्येकी १५०० रुपयांप्रमाणे वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान, योजनेसाठी खर्च होणा-या निधीचा मोठा बोजा सरकारला पेलावा लागत आहे, हे लक्षात घेऊन योजनेच्या निकषात अधिक कोटेकोरपणा येणार आहे. तसेच निवडणुकीत महिलांना १५०० रुपयांवरून आता २१०० रुपये दिले जाण्याची घोषणाही झाली. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर आता २१०० रुपयांच्या हप्त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.