लातूर : प्रतिनिधी
दिव्यांग बांधवांच्या कल्याणसाठी शासन, प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील दिव्यांग जणांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत विविध उपक्रम राबविले असून यापुढेही अशा उपक्रमांसाठी जिल्हा प्रशासन सदैव पुढाकार घेईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि जिल्ह्यातील विशेष शाळा, कार्यशाळा व मतिमंद बालगृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जि. प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य सुरेश पाटील, महिला व बाल विकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, समाज कल्याण अधिकारी विलास केंद्रे, संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, कार्यवाह डॉ. योगेश निटूरकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी नाईकवाडी यांनी प्रास्ताविकात दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. तसेच ८ हजार दिव्यांग बांधवांना १० लाखांचे साहित्य वितरीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.