18 C
Latur
Friday, December 13, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात दोघांवर कोयत्याने वार

पुण्यात दोघांवर कोयत्याने वार

पुणे : सलग तिस-या दिवशी शाळा तसेच महाविद्यालयीन तरुणांमधील वाद अन् त्यातून घडणा-या खुनाच्या घटनांनी पुणे हादरले जात असून, मध्यरात्री एका अल्पवयीन मुलाचा खून झालेला असताना भरदुपारी कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध महाविद्यालय परिसरात फिल्मीस्टाईल टोळक्याने हातात कोयते घेऊन पाठलाग करत दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. यातील एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, दुस-याला डोक्यात वार करून जखमी केले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि जखमी कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेतात. दरम्यान दुपारच्या सुमारास जखमी तरुण आरोपी तरुणाच्या मैत्रिणीसोबत बोलत होता. यावेळी तरुणीने माझ्याविषयी अफवा पसरवतो का असे म्हणत झालेला प्रकार आपल्या आरोपी मित्राला सांगितला. नंतर आरोपीने आपल्या काही मित्रांना बोलावून घेतले. हातात कोयते घेऊन या आरोपींनी जखमी तरुणाचा पाठलाग सुरू केला. महाविद्यालयाच्या पाठीमागील रस्त्यावरून मॉलसमोरून एरंडवणाच्या दिशेपर्यंत आरोपींनी या तरुणांचा हातात कोयते घेऊन पाठलाग केला. भरदुपारी आणि गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली.

दरम्यान आरोपींनी जखमी तरुण आणि त्याच्या भावाला संजीवनी हॉस्पिटलजवळ गाठले आणि कोयत्याने वार केले. यात तरुणाच्या डोक्यात कोयत्याचा घाव बसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. तर दुसरा तरुण किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल व डेक्कन पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी असलेल्या तरुणांकडे चौकशी केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पसार झालेल्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR