20.2 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeमहाराष्ट्रशनिवारपासून विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन

शनिवारपासून विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन

२८८ आमदार घेणार विधानसभा सदस्यत्वाची शपथ !

मुंबई : प्रतिनिधी
पंधरावी विधानसभा गठीत होऊन नव्या महायुती सरकारचा शपथविधी झाल्यानंतर राज्य विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन शनिवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या २८८ सदस्यांना शपथ दिली जाणार आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालीदास कोळंबकर नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी गुरुवारी आपल्या पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयात पदभार स्वीकारताना मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत निवडून आलेल्या आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारकडून राज्यपालांना तशी शिफारस करण्यात आली. त्यानुसार आज सकाळी ११ वाजल्यापासून मुंबईत विशेष अधिवेशनाला सुरुवात होईल. सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे शपथ घेतील. त्यानंतर सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्य, महिला सदस्य या क्रमाने शपथविधी पार पडेल. पहिल्या दिवशी जास्तीत जास्त सदस्यांना शपथ देण्याचा प्रयत्न होणार आहे. दुस-या उर्वरित सदस्यांना शपथ देऊन सदस्यांच्या शपथविधीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

७ आणि ८ डिसेंबर अशा दोन दिवसात आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर तिस-या दिवशी म्हणजे ९ डिसेंबरला विधानसभा अध्यक्ष निवडला जाईल. विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर विधिमंडळाच्या संयुक्त बैठकीत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिभाषण होईल. दरम्यान विधान परिषदेची बैठक ९ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आली आहे.

कोळंबकर हंगामी अध्यक्ष
विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला उद्या सुरुवात होत असून, या अधिवेशनासाठी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ आमदार कालीदास कोळंबकर यांची निवड करण्यात अली आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली. कोळंबकर हे आठव्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. १९९० पासून ते सातत्याने विधानसभेवर निवडून येत आहेत. २०१४ मध्येही कोळंबकर यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR