27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमनोरंजनअल्लू अर्जुनकडून मृत महिलेच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत

अल्लू अर्जुनकडून मृत महिलेच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत

हैदराबाद : पुष्पा २ ची सध्या चांगलीच हवा आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ ने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करायला सुरुवात केली. पुष्पा २ च्या यशाला पहिल्याच दिवशी गालबोट लागलं. हैदराबाद येथे पुष्पा २ चा प्रीमियरला झाला होता. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तिचा मुलगा जखमी झाला. या घटनेनंतर अल्लू अर्जुनवर गुन्हा नोंदवला गेला. अखेर या दुर्घटनेवर अल्लू अर्जुनने मौन सोडले आहे.

पुष्पा २ फेम अल्लू अर्जुनने ट्विटरवर व्हीडीओ शेअर करत सांगितले आहे की, या कठीण काळात मी त्या महिलेच्या कुटुंबासोबत उभा राहीन. त्या कुटुंबासाठी जे शक्य होईल ते मी करेन. मी त्यांना २५ लाखांची नुकसानभरपाई देण्याचे जाहीर करतो. याशिवाय उपचाराच्या सर्व खर्चाची मी मदत करेन. अशाप्रकारे अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर भावुक प्रतिक्रिया देत मृत महिलेच्या कुटुंबाला धीर दिला आहे. याशिवाय त्यांना आर्थिक मदत जाहीर केली.

काय होती ती दुर्घटना?
दिलसुखनगर येथे राहणारी महिला रेवती तिचे पती भास्कर आणि दोन मुले श्रीतेज(९) आणि संविका (७) यांच्यासोबत पुष्पा २ च्या प्रीमियरला उपस्थित होती. प्रीमियरच्या वेळेस गर्दीत असलेल्या लोकांनी गेट तोडण्याचा प्रयत्न केल्याने मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याने यात रेवती आणि तिचा मुलगा श्रीतेज बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी दुर्गाबाई देशमुख हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी रेवती यांना मृत घोषित केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR