मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुक्रवारी मोठा दिलासा मिळाला. दिल्लीच्या बेनामी न्यायाधिकरण न्यायालयाने ऑक्टोबर २०२१ मध्ये प्राप्तिकर विभागाच्या ताब्यातून अजित पवारांच्या जप्त केलेल्या मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर जप्त केलेली मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून परत करण्यात येणार आहे.
तीन वर्षांपूर्वी अजित पवार, पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्या मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या होत्या. यावरुन विरोधकांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यावर प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी याला काहीही अर्थ नसल्याचे म्हटले आहे. तसेच यावेळी विरोधकांनी ईव्हीएमच्या मुद्यावरून आमदाकीची शपथ न घेतल्याने अजित पवार यांनी सुनावले आहे.
मी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये काम केलेले आहे. या निवडणुकीत ईव्हीएमला दोष देण्यात काही अर्थ नाही. लोकसभेत ईव्हीएमने महाविकास आघाडीला ३१ जागा दिल्या. त्यावेळेस ईव्हीएम खूप चांगले होते. इकडे मात्र असा निकाल लागला त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली.
लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना त्यांनी काय वक्तव्य करायचे हा त्यांचा अधिकार आहे. पण उद्याचा शपथ घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल तरच परवा सभागृहामध्ये ते कामकाजात भाग घेऊ शकतात. ही प्रक्रिया सगळ्यांना माहिती आहे. परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळे करत आहे, आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा त्यांचा केविलवाणा प्रकार सुरू आहे. त्याला काही अर्थ नाही असे अजित पवार म्हणाले.
ईव्हीएमवर विनाकारण वाद
सुरुवातीला हे सगळे आत बसले होते. आमच्यापैकी आठ दहा लोकांच्या शपथ झाल्यानंतर एकदम अचानक मी शपथ घेऊन खाली उतरताना ते नेमके बाहेर निघाले होते. त्यावेळी काहींना विचारले की कुठे चालला आहात त्यांनी असेच चाललोय असे सांगितले. त्यांच्यातल्या काही लोकांना आता विचारले तर ते म्हणाले की आम्हाला सांगितले की आज आपण शपथ घ्यायची नाही. काही नवीन स्ट्रॅटेजी आहे कोण म्हणतंय ईव्हीएम हॅक करता येते तर कोण दुसरे काही म्हणतय, असेही अजित पवार म्हणाले.