पुणे : महाराष्ट्रातील नागरिकांना गुलाबी थंडी अनुभवाच्या दिवसात पावसाळ्याचा आनंद घेताना दिसत आहे. डिसेंबर म्हणजे थंडीचे दिवस सुरू असताना गेले दोन दिवस राज्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आता कधी थंडी तर कधी आभाळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, आता कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे आता पुढील तीन दिवस राज्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
गेले दोन दिवस राज्यात पाऊस पडत आहे. त्यामुळे आता थंडीचा जोर कमी झाला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातही पुढील दोन दिवस हवामान कोरडे तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील. तर गोंदिया जिल्ह्यात चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. मात्र, या अवकाळी पावसामुळे धान पिकाबरोबर भाजीपाला आणि तुर पिकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बळीराज्याच्या सुखात मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातही पावसाची शक्यता
पुढील ४८ तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळी वा-यासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळ्ण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान वा-याचा वेग ताशी ३० ते ४० एवढा असेल. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे.