मुंबई : विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड होण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकरांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. महाविकास आघाडीकडून कुणीही अध्यक्षपदासाठी अर्ज न भरल्याने नार्वेकर बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नार्वेकरांच्या निवडीची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.
मागील २ दिवसांपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू असून त्यात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. आज ८ डिसेंबरला दुपारी १२ वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकरांनी विधिमंडळ सचिवांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. दिलेल्या मुदतीत केवळ राहुल नार्वेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने उद्या ९ डिसेंबरला अधिवेशनात राहुल नार्वेकर यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार आहे.
विधानसभेतील रणनीतीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची सकाळी बैठक पार पडली. त्यात विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरायचा की नाही यावर चर्चा झाली. त्यात मविआकडून कुणीही उमेदवारी अर्ज भरायचा नाही असे ठरले. त्यात महायुतीकडून राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवडीचा घोषणा उद्या अधिवेशनात होईल. मात्र विरोधी पक्षाकडून सत्ताधा-यांना २ प्रस्ताव देण्यात आले आहेत. त्यात विधानसभेचे उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपद मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे यावर सत्ताधारी काय निर्णय घेतात ते पाहावे लागेल.
कोण आहेत राहुल नार्वेकर?
राहुल नार्वेकर हे भाजपाचे कुलाबा मतदारसंघातील आमदार आहेत. २०२२ साली वयाच्या ४५ व्या वर्षी ते विधानसभा अध्यक्ष बनणारे पहिलेच तरुण अध्यक्ष होते. नार्वेकर हे कायद्याचे पदधीवर असून त्यांनी ब-याच संस्थांमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणूनही काम केले आहे. राहुल नार्वेकरांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून झाली, त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले आणि सध्या ते भाजपात आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे ते जावई आहेत. शिवसेना-राष्ट्रवादीतील फुटीनंतर राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी केली होती. आता पुन्हा राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष बनणार आहेत.