मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापन होण्यास बराच काळ लागला. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याकडे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ११ नेते मंत्री बनणार असल्याची माहिती समोर आली आहे.एकनाथ शिंदेंच्या दोन नेत्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. हे दोन्ही नेते मागच्या सरकारमध्ये मंत्री होते. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेंच्या शिवसेनेने माजी मंत्री आणि संभाव्य मंत्र्यांची यादी तयार केली आहे. यात दोन माजी मंत्र्यांची नावे वगळण्यात आली आहेत.
सूत्रांनुसार, गेल्या सरकारमध्ये संधी न मिळालेले भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जून खोतकर आणि विजय शिवतारे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे. महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला १३ ते १४ मंत्रीपदे मिळणार असून त्यापैकी १०-१२ मंत्री आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेऊ शकतात.
कोणाची नावे वगळली?
सूत्रांच्या माहितीप्रमाणे माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार नाही. दोन्ही मंत्र्यांना मागच्या कार्यकाळातील कामगिरी आणि वाद यामुळे सामावून घेतले जाणार नसल्याचे समजते. त्याऐवजी शिवसेनेकडून नवीन पाच आमदारांना मंत्रिमंडळात सामील केले जाण्याची शक्यता आहे.
या ११ नेत्यांची नावे चर्चेत
१) गुलाबराव पाटील
२) उदय सामंत
३) दादाजी भुसे
४) शंभुराज देसाई
५) तानाजी सावंत
६) दीपक केसरकर
७) भरत गोगावले
८) संजय शिरसाट
९) प्रताप सरनाईक
१०) अर्जून खोतकर
११) विजय शिवतारे