मुंबई : विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु झाले आहे. त्यासोबतच विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजप आमदार राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
रविवारी महाविकास आघाडीतील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नाना पटोले, विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली. महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यासोबतच त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष पद आणि विरोधी पक्षनेते पदाचा प्रस्ताव सत्ताधा-यांना दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला विक्रमी बहुमत मिळाले आहे. तर, महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपदासाठीचे संख्याबळ नाही. त्यामुळे विरोधकांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना एक प्रस्ताव दिला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. महायुतीने राहुल नार्वेकर यांचा विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीने या निवडणुकीतून माघार घेतली. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन महाविकास आघाडीने विरोधी पक्षनेतेपद देण्याचा प्रस्ताव दिला आहे.
महाविकास आघाडी ही निवडणूक पूर्व आघाडी आहे. महाविकास आघाडीचे ४८ आमदार आहेत. याचा विचार करुन आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळाले पाहिजे, असा प्रस्ताव दिला आहे. त्यासोबतच विधानसभा उपाध्यक्षपद देखील मिळाले पाहिजे, अशीही मागणी या भेटीत करण्यात आली आहे.
महायुतीमध्ये सर्वाधिक जागा शिवसेना ठाकरे गटाच्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडे २० आमदार आहेत. त्यानंतर काँग्रेसकडे १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे १० आमदार आहेत. याबद्दल भास्कर जाधव म्हणाले की, आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते पद आम्हाला मिळावे यासाठी महाविकास आघाडी एकत्रित मिळून प्रयत्न करेल. विधानसभा अध्यक्ष निवडल्यानंतर तातडीने आम्ही प्रयत्न करू. आम्हाला विश्वास आहे की, आम्हाला विरोधी पक्ष नेते पद दिले जाईल.
विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील म्हणाले की, संसदेमध्ये सुद्धा दोन टर्ममध्ये विरोधी पक्षनेते नव्हते. विरोधी पक्षातील ज्यांची संख्या अधिक त्यांना विरोधीपक्ष नेते पद दिले जाते. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. आता यावर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बसून निर्णय घेतील असे म्हटले आहे.