मुंबई : प्रतिनिधी
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांनी आज भाषण केले. त्यांच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. संत तुकारामाचे एक अभंग म्हणातना ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’ असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुगली टाकली. विरोधकांच्या मागण्यांचा गोड अर्थात सकारात्मक विचार कराल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी आज विधिमंडळात त्यांचं पहिलंच भाषण केलं. ते वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी आमदार झाले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते सांगलीतल्या तासगाव कवळे महाकाळ मतदारसंघातून विजयी झाले आहेत. पाटील यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच विधानसभेचे नवनियुक्त अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं.
तुम्ही ज्याप्रकारे सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान पटकावलेला आहे, त्याचप्रकारे मी सर्वात तरुण सदस्य म्हणून या सभागृहात बसण्याचा मान पटकावलेला आहे. त्यामुळे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून तुमचे सर्वात तरुण विधिमंडळ सदस्याकडे लक्ष असावे अशी विनंती मी तुम्हाला करतो. असं रोहित पाटील म्हणाले.
पुढे बोलताना रोहित पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आता संतांच्या वाणीतूनही आपले नाव इतक्या गोड पद्धतीने घेतले गेलेले आहे. त्यामुळे पुढच्या काळात करत असताना तुम्ही विरोधी पक्षांना गोड पद्धतीची वागणूक द्याल अशी विनंती करतो, असे पाटील यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचे नाव अमृता आहे. तोच धागा पकडत रोहित पाटील यांनी भाषणातून बॅटिंग केली. ‘अमृताहुनी गोड मी मुद्दामच म्हटले कारण पुराणातसुद्धा अमृताला वेगळे महत्त्व होते आणि आजही आहे. विरोधी पक्षालासुद्धा तुम्ही सहकार्य कराल अशी मी तुम्हाला विनंती करतो असे पाटील म्हणाले.