26.7 C
Latur
Monday, January 6, 2025
Homeधाराशिवकेसरजवळगा येथे रक्तवर्धक गोळ्या खाल्ल्याने ३३ विद्यार्थ्यांना त्रास सुरु

केसरजवळगा येथे रक्तवर्धक गोळ्या खाल्ल्याने ३३ विद्यार्थ्यांना त्रास सुरु

गांधी विद्यालयात विद्यार्थ्यांना उलटी मळमळ, शिक्षक, आरोग्य विभागाच्या सतर्कतेने विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

मुरूम : प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथील महात्मा गांधी विद्यालयात आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या रक्तवर्धक गोळ्या खाल्ल्याने तब्बल ३३ विद्यार्थ्यांना मळमळ व उलटीचा त्रास झाल्याची घटना सोमवारी (दि.९) घडली. सर्व विद्यार्थ्यांवर मुरुम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून प्राथमिक उपचारांती सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

आरोग्य विभागाकडून सहावी ते दहावी या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या शरीरातील लोह वाढवा व रक्ताचे प्रमाण संतुलित राहावे, यासाठी सर्वच शाळात आर्यन फॉलिक अ‍ॅसिड शरीरासाठी उत्तम असलेल्या गोळ्या देण्यात येतात. याच अनुषंगाने केसरजवळगा येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना ९ डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात जवळपास १८० विद्यार्थ्यांना सदर गोळ्या देण्यात आल्या होत्या. यापैकी ३३ विद्यार्थ्यांना गोळ्या खाल्ल्याने मळमळ व उलटीचा त्रास जाणवल्याने शिक्षकांनी या घटनेची माहिती आरोग्य विभागाला देत तुरंत सर्व त्रस्त विद्यार्थ्यांना मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांची तपासणी करून उपचार करण्यात आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच उमरगा-लोहारा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले व जिल्हा परिषदचे माजी विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. उपचाराची डॉक्टरकडून माहिती घेतली. पालकांना न घाबरण्याचे आवाहन केले. विद्यमान आमदार प्रवीण स्वामी यांनी भ्रमणध्वनीवरून डॉक्टरांशी संपर्क साधून या घटनेची माहिती घेत उपचाराबाबत सतर्कता बाळगून घटनेचा लेखी अहवाल सादर करण्याची सूचना केली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR