मुंबई : मुंबईतील कुर्ल्यामध्ये बेस्ट बसच्या भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. कुर्ला एलबीएस रोडवर बेस्टच्या बसने अनेक जणांना धडक दिली. या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर २० जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी कुर्ला येथील अंजुम – ए – इस्लाम शाळेसमोर बेस्टच्या बसचा अपघात झाला. बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला. यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून जवळपास २० जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कुर्ला एल वॉर्डातील या वर्दळीच्या रस्त्यावर बेस्ट बस चालकाकडून वाहनांना धडक देण्यात आली असून त्यात एका रिक्षाचा ही चक्काचूर झाले असल्याचे समोर आले आहे.
या घटनेतील जखमींना जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींच्या प्रकृतीची माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यान, बेस्ट बस चालक आणि घटनेप्रकरणी अद्याप बेस्ट उपक्रमाकडून कोणतीही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.