पुणे : आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. बच्चे कंपनीपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांना आंब्याची गोडी चांगलीच आवडते. त्यातच हापूस आंबा अधिकच चवदार असल्यामुळे त्याला मागणी मोठी असते. देशात नाही विदेशात हापूस आंब्याला मागणी येते. आता हापूस आंबा थाटात बाजारात दाखल झाला आहे. पुणे बाजारात देवगड हापूसची पहिली पेटी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच आली आहे.
देवगड हापूसच्या उत्पादनातील आंब्याची पहिली आवक पुणे बाजार समितीमधील गुलटेकडी मार्केटमध्ये आली आहे. आंब्याची पहिली पेटी घेण्यासाठी ग्राहकांनी बोली लावली. त्यामुळे हापूसच्या पहिल्या पेटीला उच्चांकी दर मिळाला.
हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीचा लिलाव आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची यांच्या गाळ्यावर झाला. त्यांच्याकडे देवगड हापूसच्या पाच पेट्या आल्या. या पाच पेट्यांपैकी पाच डझनच्या एका पेटीला तब्बल २१ हजार रुपये दर मिळाला. त्या खालोखाल इतर पेट्यांना १५ हजार आणि ११ हजार दर मिळाला आहे. त्यामुळे आंबा उत्पादक खुश झाले.