मुंबई : कुर्ला येथे बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने गाड्या, रिक्षांसह पादचा-यांना धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात सात जणांना प्राण गमवावे लागले, तर तब्बल ४८ जण जखमी झाले आहेत. आरोपी बसचालक संजय मोरे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय मोरेच्या पत्नीने आपला पती निर्दोष असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. पती कधीच दारू पिऊन गाडी चालवणार नाही, त्याने कधीही अपघात घडवलेला नाही, असा दावाही तिने केला.
ड्युटीवर जाताना कुठलंही भांडण झालं नव्हतं. मी स्टॉलवर जाते, माझ्यासोबत तेही मेहनत करतात. बरोबर एक वाजता ड्युटीला निघतात, वेळ कधीही चुकवत नाहीत. माझा नवरा दारू अजिबात नाही घेणार, एवढी मला गॅरंटी आहे, एवढा विश्वास मला माझ्या नव-यावर आहे. तो कोणाला त्रास नाही देणार, आमच्या पूर्ण एरियातही कोणाकडे वर मान करून तो कधी बोललेला नाही, असे संजय मोरे याच्या पत्नीने माध्यमांना सांगितले.
कधीही अपघात केला नाही
माझ्या लग्नाला २३ वर्षे झाली, पण त्याने कधीही गाडी ठोकली नाही. त्याने ज्या कंपनीत काम केले, तिथे त्याचे चांगले रेकॉर्ड आहे. मोरे आहे म्हटल्यावर कोणी नाव नाही ठेवणार. माझा नवरा निर्दोष आहे, तो सुटणार, ही घटना झाली ती चुकून झाली आहे. त्याने कधी कोणाचं वाईट नाही केलं. माझ्या नव-याचा काही दोष नाही, जर बसचा ब्रेकच फेल झाला असेल, गाड्या रिन्यू केल्या नसतील, त्याला माणूस काय करणार? ड्रायव्हरचं काम नाही सगळ्या गाड्या चेक करणं, असे त्याची पत्नी म्हणाली.
तांत्रिक बिघाड झाल्याचा दावा खोटा?
अपघातग्रस्त बसचे ब्रेक फेल झाल्याबाबत चालक संजय मोरेने केलेला दावा खोटा असल्याचे बोलले जात आहे. इलेक्ट्रिक बसमध्ये बिघाड झाल्यास त्या पुढे जात नाहीत, त्यामुळे ब्रेक फेल होऊनही त्या भरधाव वेगात पुढे गेल्याच्या दाव्यात तथ्य नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. तसेच ही बस बेस्टच्या ताफ्यात अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच दाखल झाल्याने तिच्यात बिघाड होण्याची शक्यताही कमी असल्याचे बोलले जात आहे.