छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यात यंदा एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान सहा धडधाकट व्यक्तींनी आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून दिव्यांग व्यक्तीची निवड केली. या दाम्पत्यांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून ५० हजार रुपये प्रोत्साहन रक्कम दिली गेली. समाजातील दिव्यांग व्यक्तींना सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे यासाठी दिव्यांग आणि दिव्यांग नसलेल्या व्यक्तींच्या विवाहास शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते.
शासनाकडून आंतरजातीय विवाह करणा-या जोडप्यांना ज्या प्रकारे आर्थिक साहाय्य केले जाते त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साहाय्याची योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत दिव्यांग-अव्यंग विवाहास प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाते. यावर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाअंतर्गत दिव्यांग व दिव्यांग नसलेल्या सहा जोडप्यांनी अर्थसहाय्यतेसाठी अर्ज केले होते.
शासनाकडून प्रति जोडपे ५० हजार रुपये याप्रमाणे सहा जोडप्यांसाठी तीन लाख रुपये समाज कल्याण विभागाला प्राप्त झाले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी विवाह झाल्यानंतर किमान एका वर्षात जिल्हा परिषद समाजकल्याण कार्यालयात अर्ज करणे बंधनकारक आहे.
अशी मिळते आर्थिक मदत
या योजनेत लाभार्थींना रोख २० हजार रुपये देण्यात येतात. २५ हजार रुपयांचे बचत प्रमाणपत्र दिले जाते. साडेचार हजार रुपयांचे संसारोपयोगी साहित्य देण्यात येते. ५०० रुपये स्वागत समारंभासाठी दिले जातात. अशी एकूण ५० हजार रुपयांची मदत देऊन या जोडप्यांचा सत्कार केला जातो.