हैदराबाद : तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या काही तास आधी आंध्र प्रदेशने कृष्णा नदीवरील नागार्जुन सागर धरण ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, आंध्र प्रदेशने त्यातउन पाणी सोडण्यास सुरुवात केली, त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. गुरुवारी रात्री २ च्या सुमारास, तेलंगणाचे बहुतेक अधिकारी निवडणूक बंदोबस्तात व्यस्त असताना आंध्र प्रदेशातील सुमारे ७०० पोलिसांनी धरणावर छापा टाकला. उजवा कालवा उघडला आणि ताशी ५०० क्युसेक पाणी सोडले.
आंध्र प्रदेशचे पाटबंधारे मंत्री अंबाती रामबाबू यांनी गुरुवारी सकाळी ट्विटरवर एक संदेश पोस्ट केला की, आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी कृष्णा नदीच्या नागार्जुन सागर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडत आहोत. यासोबतच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांच्यात झालेल्या करारानुसार एवढेच पाणी आपण घेतल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले होते.
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारने हस्तक्षेप करत दोन्ही राज्यांना नागार्जुन सागरमधून सोडलेले परत करण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशसोबत व्हीडीओ कॉन्फरन्सदरम्यान हा प्रस्ताव मांडला. यावर दोन्ही राज्यांचे एकमत झाले आहे. यापुढील संघर्ष टाळण्यासाठी या धरणावर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) नजर ठेवणार असून करारानुसार दोन्ही बाजूंना पाणी मिळत आहे की नाही यावर लक्ष ठेवले जाणार आहे.
तेलंगणाच्या मुख्य सचिव शांती कुमारी यांनी आरोप केला होता की, आंध्र प्रदेशातील सुमारे ५०० सशस्त्र पोलिस नागार्जुन सागर धरण परिसरात घुसले आणि त्यांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. तसेच गेट क्रमांक ५ येथे असलेले हेड रेग्युलेटर उघडले आणि सुमारे ५,००० क्यूसेक पाणी चोरले.