संविधानावर चर्चा, राहुल गांधी यांचा हल्लाबोल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेत सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आज संविधानावर चर्चा झाली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधानावर बोलताना केंद्र सरकारवर विविध मुद्यांवरून जोरदार हल्लाबोल केला. ज्या प्रकारे द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला होता, अगदी त्या प्रकारे देशातील युवकांचा अंगठा, शेतक-यांचा अंगठा कापण्याचे काम हे सरकार करत आहे, असा आरोप केला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन, अग्निवीर योजना, पेपरफुटीसह हाथरस घटनेच्या मुद्यांवरून सरकारवर हल्लाबोल करत सावरकरांनी संविधानापेक्षा मनुस्मृतीला वरचे स्थान दिल्याचे विधान राहुल गांधींनी केले.
संविधान आमचा विचार आहे. मात्र, ‘आरएसएस’ने नेहमी मनस्मृतीची तळी उचलून धरली. आज देशात जे इमानदारीने काम करतात, त्यांचा अंगठा कापण्याचे काम सरकार करते. देशातील गरिबांचा अंगठा कापण्याचे काम केले जात आहे. आज देशातील तरुण सकाळी ४ वाजता उठून वेगवेगळ््या परीक्षांची तयारी करतात आणि आर्मीमध्ये भर्ती होण्याचे स्वप्न पाहतात. पण केंद्र सरकारने अग्निवीर योजना लागू करून त्या तरुणांचा अंगठा कापण्याचे काम केले. देशात अनेक ठिकाणी पेपर फुटल्याच्या घटना घडल्या. तब्बल ७० वेळा पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या, तेव्हादेखील सरकारने देशातील तरुणांची बोटे कापण्याचे काम केले, असा आरोप राहुल गांधींनी केला.
दिल्लीच्या बाहेर तुम्ही शेतक-यांना रोखून त्यांच्यावर लाठीचार्ज केला. ते शेतकरी सरकारकडे काय मागतात तर एमएसपी. त्यांच्या शेती पिकाला योग्य दर मागतात. हे मात्र सरकार अदानी आणि अंबानींचा फायदा करण्याचे काम करते आणि शेतक-यांचा अंगठा कापण्याचे काम करते. पेपर फुटले पाहिजेत. अग्निवीर योजना राबवली जावी, असे संविधानात कुठेही नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली.
उत्तर प्रदेशात संविधान
नव्हे मनुस्मृती लागू
हाथरसच्या घटनेबाबत बोलताना हाथरस घटनेतील आरोपी बाहेर फिरतात आणि पीडित कुटुंब घरात बंद आहे. त्या पीडित कुटुंबाला त्या मुलीचे अंत्यसंस्कार करु दिले नाहीत. तेथील मुख्यमंत्री त्या घटनेबाबत खोटे बोलले. आता आरोपी त्या कुटुंबाला धमकावतात. कारण उत्तर प्रदेशात संविधान नाही तर मनुस्मृती लागू आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला. यावेळी त्यांनी सावरकरांनीदेखील संविधानापेक्षा मनुस्मृतीला वरचे स्थान दिले होते, असे म्हटले. त्यावरून भाजपने पलटवार केला.
छोट्या व्यावसायिकांचा
धारावीत अंगठा कापला
अंगठ्यामुळे अभय मुद्रामध्ये आत्मविश्वास येतो. हे लोक विरोधात आहेत. जसा द्रोणाचार्याने एकलव्याचा अंगठा कापला, तसाच तुम्ही देशाचा अंगठा कापण्यात व्यस्त आहात. अदानींना धारावी देताना तुम्ही धारावीतील उद्योगपती आणि छोट्या व्यावसायिकांचा अंगठा कापला. तुम्ही बंदरे, विमानतळ, संरक्षण उद्योग अदानींना दिले आणि सर्व प्रामाणिक उद्योगपतींचे अंगठे कापले, असा आरोप राहुल गांधींनी केला.