नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने राऊस एव्हेन्यू कोर्टात संजय सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र ६० पानांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. संजय सिंगच्या जामीन याचिकेवर न्यायालयाने ईडीकडून ६ डिसेंबरपर्यंत उत्तर मागितले होते. संजय सिंह सध्या तुरुंगात आहेत.
मनी लाँड्रिंग विरोधी संस्थेने ४ ऑक्टोबर रोजी संजय सिंग यांना अटक केली होती. ईडीने आरोप केला आहे की संजय सिंग यांनी आता रद्द केलेल्या उत्पादन शुल्क धोरणाची निर्मिती आणि अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, त्यामुळे काही मद्य उत्पादक, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते यांना फायदा झाला. मात्र, संजय सिंह यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
कथित अबकारी घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय सिंग यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर न्यायालयाने ईडीला ६ डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. या अर्जावर विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांनी केंद्रीय तपास यंत्रणेला नोटीस बजावली होती. संजय सिंग यांना कोठडीत ठेवून कोणताही हेतू साध्य होणार नाही, असा दावा अर्जात करण्यात आला आहे. न्यायालयाच्या मुदतीपूर्वीच ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे.