सोलापूर : दोन दिवसाच्या अवकाळीने पावसाने जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ३७ हजार ६१७ शेतकऱ्यांच्या २९ हजार ७७५ हेक्टरला फटका बसला आहे. कृषी विभागाने नुकसानीचा नजर अंदाज अहवाल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सादर केला आहे. जिल्ह्यात २८ व २९ नोव्हेंबरला अवकाळी पाऊस पडला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ‘कृषी’ विभागाने नुकसानीचा नजर अंदाज अहवाल सादर केला आहे.
त्यानुसार पंढरपूर, बार्शी, करमाळा या तीन तालुक्यात अवकाळी पावसामुळे काहीच नुकसान झाले नसल्याचे नजर अंदाज अहवालात म्हटले आहे. तसेच मोहोळ व माळशिरस तालुक्यातील जिरायती क्षेत्रावरील पिकांचे काहीच नुकसान झाले नाही, असेही त्यात म्हटले आहे. हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला असून, पंचनाम्यानंतर नेमके किती नुकसान झाले हे स्पष्ट होणार आहे. आठ तालुक्यातील २० हजार ३३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, सहा हजार ३१३ हेक्टर बागायती क्षेत्रावरील आणि तीन हजार १३२ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचे ‘कृषी’च्या अहवालात नमूद आहे.
अवकाळीचा सर्वाधिक फटका दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. एकाच तालुक्यातील २७ हजार ३६० शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर झाल्यानंतर तो शासनाला पाठविण्यात आला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे तातडीने होणे अपेक्षित आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना सरकारकडून भरपाई लवकर मिळेल. पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना कधीपर्यंत सादर होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.