25.5 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्ररवी राणांना पुन्हा मंत्रिपदाची हुलकावणी

रवी राणांना पुन्हा मंत्रिपदाची हुलकावणी

अमरावती : प्रतिनिधी
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अमरावती जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाली होती. मात्र, महायुती सरकारच्या दोन्ही कार्यकाळात जिल्ह्यात मंत्रिपदाची पाटी कोरीच आहे. तसेच यंदा मंत्रिमंडळात बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांना मंत्रिपदाची वर्णी लागणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, मंत्रिमंडळात रवी राणांचे नाव न आल्याने ते नाराज असल्याचे बघायला मिळत आहे.

निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तेव्हापासून बडनेरा विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झालेले आमदार रवी राणा यांना मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. तसंच अमरावतीतील विविध चौकांमध्ये ‘रवी राणा भावी मंत्री’ असे पोस्टर देखील लावण्यात आले होते. मात्र, रवी राणा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही.

त्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे. अमरावती जिल्ह्यातील आठ पैकी सात विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आलेत. यापैकी अमरावती विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, त्यांनादेखील मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.

नवनीत राणांची भावूक पोस्ट
रवी राणा यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ न पडल्यानं भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘जिंदगी है, समुंदर को क्या कम है, ओ बता भी नही सकता, ओ पाणी बनकर आखों मे भी आ नही सकता, जिंदगी है और लढाई जारी है’ असा व्हिडिओ पोस्ट करत नवनीत राणांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR