नंदुरबार : प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील घोडे बाजार देशभरात प्रसिद्ध आहे. सारंगखेडा येथील यात्रोत्सवाला सुरवात होत असून या यात्रोत्सवात होणा-या घोडेबाजारात २४०० पेक्षा अधिक घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. एकापेक्षा एक रुबाबदार असे घोडे या ठिकाणी येणा-या अश्वप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. यात उत्तर प्रदेशमधून आलेली रुची सध्या सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्यात उद्यापासून म्हणजे १८ डिसेम्बरपासून सुरू होणा-या चेतक फेस्टिवलसाठी देशभरातील १४ राज्यातून अश्व मालक आपल्या घोड्यांसह दाखल होणार आहेत. त्यात अश्व नृत्य स्पर्धा, आश्व सौंदर्य स्पर्धा, घोड्यांच्या रेस तसेच अश्व क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. अशी माहिती चेतक फेस्टिवलचे आयोजक जयपालसिंह रावल यांनी दिली आहे. या ठिकाणी आतापासून घोडे दाखल झाले आहेत.
तापी नदीच्या काठावर भरलेल्या अश्वमेळाव्यात उत्तर प्रदेशातील बरेली येथून आलेली रुची आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे. साडेचार वर्षीय रुचीचा रुबाब एखाद्या पैलवानासारखा आहे. सातपुड्यात थंडीचे प्रमाण अधिक असल्याने तिच्या खुराकाची विशेष काळजी घेतली जात आहे. तीन लिटर दूध, अंडी, गहू, बाजरी तसेच सरसोचे तेल ह्या त्याच्या खुराकात दिल्या जातात. विशेष म्हणजे चार व्यक्ती तिच्या मालिशसाठी दिवसभर तैनात असतात.