नागपूर : राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आहेत. एकीकडे मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मागील 24 तासांपासून कुणालाच भेटले नाहीत. नागपुरातील विजयगड निवासस्थानी भेटायला येणा-या कार्यकर्त्यांनाही अजित पवार बंगल्यावर नसल्याची माहिती दिली जात आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहात उपस्थित नव्हते. तर आज देखील अजित पवार विधानभवनात अद्याप उपस्थित नाहीय. अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून गायब आहेत. छगन भुजबळ यांच्यासह काही नेते मंत्रिमंडळात स्थान नाही. यावरून नाराज असतानाच मात्र गायब अजित पवार आहेत. छगन भुजबळ यांचा रोख अजित पवार यांच्याकडे असल्याने अजित पवार दूर आहेत का? याची जोरदार चर्चा सुरु आहे.
अजित पवारांच्या घराबाहेर ओबीसी समाजाचेआंदोलन
बारामतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीच्या बाहेर ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. अजित पवारांनी छगन भुजबळ यांचं मंत्रीपद नाकारले त्यामुळे आम्ही अजित पवारांच्या घराबाहेर त्या आंदोलन करीत आहोत असे आंदोलकांचे म्हणणे आहे. तसेच लवकरात लवकर अजित पवार अजित पवारांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे अन्यथा बारामतीत उद्रेक करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. तसेच २२ तारखेला बारामतीत अजित पवारांचा नागरि सत्कार आहे त्यावेळेस अजित पवारांना आम्ही जाब विचारू असं ओबीसी आंदोलकांचे म्हणणे आहे.
अजित पवार कशी समजूत काढणार?
आजवर जेव्हा जेव्हा भुजबळ अडचणीत आलेत किंवा मोठी लढाई लढण्याची त्यांनी तयारी केली तेव्हा तेव्हा समता परिषद आणि भुजबळ समर्थक मैदानात उतरले आहेत. आताही ते समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी आणि येवल्यातील जनतेशी संवाद साधून पुढील निर्णय घेतील असं सांगितलं जात आहे. आणखी एका बंडाच्या तयारीत असणा-या छगन भुजबळ यांची समजूत अजित पवार कशी काढणार हे पाहावं लागणार आहे.
पुन्हा पहाटे बघा कुठे आहेत : उद्धव ठाकरे
मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजितदादा पवार हे ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. याबद्दल प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांची जुनी सवय आहे. पुन्हा पहाटे बघा कुठे आहेत, ते ’ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं आक्रमक झाले आहेत. भुजबळ आपली नाराजी सातत्यानं बोलून दाखवत आहेत. भुजबळांच्या समर्थकांकडूनही अजितदादा पवार यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले आहेत. राजकीय वातावरण तापल्यामुळे अजितदादा पवार यांनी अधिवेशनाला दांडी मारल्याचे बोलले जात आहे.
पुन्हा नॉट रिचेबल? वाह रे लोकशाही : दमानिया
बारामतीत की नागपुरातच आहे? हे कोणलाही माहिती नाही. त्यामुळे अजितदादा कुठे गेले आहेत? याबद्दल राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ‘एक्स’ अकाउंटवर एक ट्विट केलं आहे. ‘‘पुन्हा नॉट रिचेबल? वाह रे लोकशाही,’’ अशी पोस्ट अंजली दमानिया यांनी केली आहे. एकप्रकारे दमानिया यांचा रोख अजितदादा पवार यांच्याकडे असल्याचे बोललेजात आहे.