पुणे : प्रतिनिधी
देशाच्या विकासासाठी समाजातील सर्व घटकांना सक्षम करणे आवश्यक आहे.देशाचा विकास हा फक्त सेवेपुरता मर्यादित नाही.तर सेवेतून नागरिकांना विकासक्षम बनवायला हवे.अशा विकासक्षम नागरिकांमुळेच राष्ट्राची प्रगती होते,असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले.
येथील ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी येथे आयोजित ‘भारत विकास परिषद विकलांग केंद्रा’च्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते.यानिमित्त राज्यस्तरीय मोफत दिव्यांग शिबीर आयोजित करण्यात आले होते.ज्यामध्ये तब्बल १२०० दिव्यांगांना मॉड्युलर कृत्रिम हात व पाय बसविण्यासाठी मोजमाप घेण्यात आले.
सरसंघचालक पुढे म्हणाले, काही अंशी अहंकार ही माणसाला कार्य प्रवृत्त करण्यास आवश्यक प्रेरणा ठरते. त्या पलीकडे येते ती शाश्वत प्रेरणा.ती चिरंतन असते. त्यातून निर्माण होणारा सेवाभाव म्हणजे सेवानिष्ठांची मांदियाळी होय.आपलेपणाचा स्त्रोत एकसारखाच असतो त्यातून लोकोत्तर प्रेरणेने सेवा घडते.
फाउंडेशन अध्यक्ष दत्ता चितळे, सचिव राजेंद्र जोग, केंद्र प्रमुख विनय खटावकर, ढोलेपाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोले पाटील उपस्थित होते. मॉड्यूलर फूटबद्दल सुमित भौमिक यांनी तांत्रिक माहिती दिली. यावेळी विनय खटावकर यांना पहिल्या ‘दिव्यांग मित्र’ पुरस्काराने गौरविण्यात आले. राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन, तर दत्ता चितळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. भक्ती दातार यांनी वैयक्तिक गीत सादर केले आणि राजेंद्र जोग यांनी आभार मानले.