19.1 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeमहाराष्ट्रपोलिस निरीक्षक घोरबांड निलंबित

पोलिस निरीक्षक घोरबांड निलंबित

परभणी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत निवेदन

नागपूर : परभणी येथील प्रकरणात न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या कुटुंबीयास दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच बळाचा अतिरेकी वापर केल्याप्रकरणी चौकशी होईपर्यंत पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करण्यात येईल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी परभणीतील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर झालेली दगडफेक, जाळपोळ संदर्भात शुक्रवार, दि. २० रोजी अल्पकालीन चर्चेनंतर ते बोलत होते. परभणीत जी जाळपोळ झाली त्याच्या व्हीडीओत सोमनाथ सूर्यवंशी दिसत असल्याने त्यास अटक करण्यात आली. दोन वेळा न्यायालयासमोर हजर केल्यानंतर पोलिसांकडून मारहाण झाली का? असे न्यायाधीशांनी विचारल्यानंतर सोमनाथ यांनी नाही असे सांगितल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले. सोमनाथ यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता. न्यायालयीन कोठडी असताना सकाळी छातीत जळजळ सुरु झाली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना उपचारार्थ सरकारी दवाखान्यात नेले असता मृत म्हणून घोषित करण्यात आल्याचे मुख्यमंर्त्यांनी सांगितले.

संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस करणारा आरोपी दत्तराव सोपानराव पवार (वय ४७) हा मनोरुग्ण असल्याचे स्पष्ट झाले असून २०१२ पासून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले. या घटनेच्या दिवशी सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघालेला होता. त्याच्याशी या प्रकरणाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न होत असला तरी ही व्यक्ती त्या मोर्चात नव्हती. मोर्चा विसर्जित झाल्यानंतर पाच तासांनी ही घटना घडली आहे. मनोरुग्णाने समाजाचे स्वास्थ्य बिघडविण्याचे काम केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणातले सर्व संशय दूर करण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंर्त्यांनी केली. दि. ११ डिसेंबरला शहरात दगडफेक व जाळपोळीचे जे प्रकार घडले त्यात एकूण १ कोटी ७९ लाख ५४ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली.

वत्सलाबाई मानवते यांनी एका महिला पोलिस कर्मचा-यावर हल्ला केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर बळाचा अतिरेकी वापर केल्या प्रकरणी चौकशी होईपर्यंत पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबीत करण्यात येईल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR