नागपूर : उपराजधानी नागपूर येथे गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजले. विधिमंडळाचे पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
विधानसभा निवडणुकीनंतर गठित झालेल्या पंधराव्या विधानसभेचे पहिले अधिवेशन आज पार पडले. महायुती सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने अधिवेशनाचे कामकाज सहा दिवस चालले. या अधिवेशनात तारांकित प्रश्नोत्तराचा तास तसेच लक्षवेधी सूचनांचा समावेश नव्हता. अधिवेशनात विधानसभेच्या एकूण सहा बैठका झाल्या. यात ४६ तास २६ मिनिटे कामकाज झाले. १० मिनिटांचा वेळ वाया गेला. दररोज सरासरी ७ तास ४४ मिनिटे कामकाज चालले. अधिवेशनात सदस्यांची ८७.८० टक्के सर्वाधिक उपस्थिती होती. तर ४८.३७ टक्के सर्वात कमी उपस्थिती नोंदवली गेली, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी दिली.
दरम्यान, पंधराव्या विधानसभेत ७८ नवीन सदस्य निवडून आले आहेत. यापैकी पाच सदस्य हे विधान परिषदेतून आले आहेत. पहिल्यांदा निवडून आलेल्या सदस्यांचा अधिवेशनात उत्तम सहभाग होता. नव्या सदस्यांनी संसदीय आयुधांचा वापर करून लोकहिताच्या प्रश्नांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केली.