नवी दिल्ली : संसदेचे यावेळचे हिवाळी अधिवेशन कमालीचे वादळी ठरले. दरम्यान, अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात संविधानावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून विरोधक आक्रमक झाले होते. तर दुसरीकडे काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी यांनी पॅलेस्टाइन, बांगलादेश आदि मुद्यांचा उल्लेख असलेल्या बॅगा सोबत आणत सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अशाच प्रिंटेड बॅगेवरून प्रियंका गांधी आणि भाजपा खासदार आमने सामने आल्याचे दिसून आले.
संसदेतील मकर द्वारावर प्रियंका गांधी आणि भाजपा खासदार अपराजिता सारंगी यांच्यात खडाजंगी झाल्याचे दिसून आले. भाजप खासदार अपराजिता सारंगी यांनी प्रियंका गांधी यांना १९८४ लिहिलेली बॅग देण्याचा प्रयत्न केला. त्यावरून प्रियंका गांधी भडकल्या. हे माझ्यासोबत करू नका असा इशाराही प्रियंका गांधी यांनी यावेळी अपराजिता सारंगी यांना दिला. अपराजिता सारंगी ह्या प्रियंका गांधी यांना जी बॅग देऊ इच्छित होत्या. त्या बॅगवर १९८४ लिहिलेले होते. १९८४ साली झालेल्या शीख हत्याकांडाशी त्याचा संदर्भ
होता.
प्रियंका गांधी आणि अपराजिता सारंगी लोकसभेमध्ये प्रवेश करत असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हीडीओ आता व्हायरल होत असून त्यामधून अपराजिता सारंगी यांनी प्रियंका गांधी यांना अचानक बॅग द्यायचे ठरवले होते असे दिसत आहे. प्रियंका गांधी यांनी सुरुवातीला ही बॅग स्वीकारली. सारंगी यांचे आभारही मानले. मात्र जेव्हा त्यावरील उल्लेख वाचला तेव्हा मात्र त्या भडकल्या. तसेच सारंगी यांना सक्त शब्दात ताकिद दिली.
काही दिवसांपूर्वी प्रियंका गांधी ह्या पॅलेस्टाईन आणि बांगलादेशबाबत संदेश लिहिलेल्या बॅग घेऊन सभागृहात आल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून अपराजिता सारंगी यांनी हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. प्रियंका गांधी ह्या ही बॅग घेऊन जात असनाता सारंगी यांनी त्यांना १९८४ हा सुद्धा एक मुद्दा आहे. तसेच तोसुद्धा प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला पाहिजे असे सांगितले होते.