भंडारा : परभणी येथील कोठडीत असणारे भीमसैनिक आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचा निषेध व दोन्ही घटनांसाठी कारणीभूत असणा-या सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी शनिवारी (दि.२१) आंबेडकरी संघटनेच्या वतीने ‘भंडारा बंद’चे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.
व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांनी बाजारपेठ बंद ठेवून ‘बंद’ला प्रतिसाद दिला. त्यामुळे गांधी चौक ते मोठा बाजार, बसस्थानक परिसर शुकशुकाट पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सकाळी मोटारसायकल रॅली काढून बाजारपेठ बंद करण्यात आली. यावेळी आंबेडकरी संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन करून उपरोक्त प्रकरणात सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.