मुंबई : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे मुंबईत एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भाच्याचे आज लग्न होते. या लग्न सोहळ्यानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण कुटुंब एकत्र पाहायला मिळाले. यावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे देखील उपस्थित होते.
मुंबईतील दादरमधील राजे शिवाजी विद्यालयात लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लग्नाला राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहिले. लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळाले. तसेच दोघांमध्ये काही संवाद देखील झाला. नुकतीच राज ठाकरेंनी रश्मी ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नाला हजेरी लावली होती.
ठाकरे बंधूंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी एकत्र यावे-
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला अवघ्या २० जागांवर विजय मिळाला. तर १२८ जागा लढवणा-या मनसेचा एकाही जागेवर उमेदवार निवडून आला नव्हता. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी एकत्र यावे, अशी चर्चा सुरू झाली आहे.