आगरतळा : ईशान्य भारतातील दहशतवाद निपटून काढल्यानंतर आता येथील पोलिस दलाच्या दृष्टिकोनात बदल करण्याची वेळ आली असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. लोकांना तत्काळ न्याय मिळण्याच्या दृष्टीने हे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
ईशान्य परिषदेच्या ७२व्या सत्रात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांत २० शांतता करारांवर स्वाक्ष-या केल्या आहेत. यातून ईशान्येत शांतता प्रस्थापित झाली असून याच्या परिणामी सुमारे ९ हजार सशस्त्र दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आता दहशतवाद संपला असल्याने पोलिसांनी थोडा दृष्टिकोन बदलायला हवा जेणेकरून लोकांना त्यांच्या प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर तीन वर्षांच्या आत न्याय मिळायला हवा.
जैविक शेतीकडे लक्ष द्या
या भागात शेती, दूध, अंडी आणि मांस याच्या उत्पादनांना चालना देऊन ग्रामीण भागातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्याची गरज शाह यांनी प्रतिपादित केली. केवळ जीडीपीतील वाढ विकासासाठी पुरेशी नाही. यासाठी भाज्या, दूध, अंडी, मांस यात स्वयंपूर्ण असणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. याशिवाय सरकार ईशान्य भारतात जैविक शेतीवर लक्ष केंद्रित करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.