मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. परंतु, सध्या चर्चा सुरू आहे ती, मंत्री धनंजय मुंडे यांची. कारण राज्यात गाजलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचे नाव आरोपींचे निकटवर्तीय म्हणून घेतले जात आहे आणि तरी देखील त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. इतकेच नाही तर मुंडे यांच्याकडे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खाते देण्यात आले आहे.
दरम्यान, खातवाटपानंतर ज्या गृहखात्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होते, ते खाते फडणवीसांनी आपल्याचकडे ठेवले आहे. त्यामुळे शिंदेंना नगरविकास आणि गृहनिर्माण खात्यावर समाधान मानावे लागले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थखात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
खातेवाटप जाहीर झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतची पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या या पोस्टमधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. तर, त्यांना दिलेली जबाबदारी ते चोखपणे पार पाडतील, असेही त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी मिळताच मंत्री धनंजय मुंडे यांनी पोस्ट शेअर करत म्हटले की, राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री तथा आमचे नेते अजितदादा पवार, आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते आदरणीय खासदार प्रफुल्ल पटेल यांसह सर्व पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करतो. राज्यातील जनतेशी थेट निगडित हे खाते असल्याने मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखवेन, असे त्यांनी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे.