मुंबई : प्रतिनिधी
कल्याणमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांची दादागिरी पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांत कल्याणमध्ये परप्रांतीयांनी अक्षरश: धुडगूस घातला आहे. चार वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करणा-याला जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तम पांडे असे मारहाण करणा-या इसमाचे नाव असून त्यांच्या पत्नीने देखील मारहाण केली आहे.
याबाबत अधिकची माहिती अशी की, मराठी कुटुंबातील चार वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान, याची माहिती संबंधित चिमुकलीच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र, जाब विचारण्यास गेलेल्या कुटुंबास उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीकडून जबर मारहाण करण्यात आली आहे.
मारहाणीत मराठी तरुण जखमी झाला आहे तर तरुणाच्या पत्नीला, आईला देखील मारहाण करण्यात आली आहे. याशिवाय यामध्ये पोलिस कर्मचारी सुद्धा जखमी झाले आहेत. या प्रकरणी पांडे पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये अशाच प्रकारे मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता.