कुवैत सिटी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांना कुवेत देशाने आपला सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ देऊन सन्मानित केले आहे. एखाद्या देशाकडून पंतप्रधान मोदींना दिला जाणारा हा २० वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
कुवेतकडून याआधी बिल क्लिंटन, प्रिंस चार्ल्स, जॉर्ज बुश यांच्यासारख्या परदेशी नेत्यांना हा सन्मान देऊन गौरवले आहे. हा सन्मान मित्रत्वाचे प्रतिक म्हणून देशांचे प्रमुख, राष्ट्राध्यक्ष किंवा शाही परिवारातील सदस्यांना दिला जातो. कुवेतचे प्रमुख अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जबर अल सबा यांनी पंतप्रधान मोदींना हा सन्मान दिला. पंतप्रधान मोदी हे शनिवारपासून दोन दिवसांच्या कुवेत दौ-यावर आहेत. मागील ४३ वर्षांत या देशात पाऊल ठेवणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. त्याआधी १९८१ मध्ये इंदिरा गांधी कुवेतला गेल्या होत्या. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा हा दौरा ऐतिहासिक मानला जात आहे. कुवेतच्या प्रमुख व्यापारी भागिदारांमध्ये भारतही त्यापैकी एक आहे.
कुवेत हा भारताला कच्चा तेलाचा पुरवठा करणारा सर्वात मोठा सहावा देश आहे. देशाच्या एकूण गरजेच्या 3 टक्के कच्चे तेल कुवेतमधून येते. भारताने कुवेतमध्ये निर्यातही वाढवली असून पहिल्यांदाच दोन बिलियन डॉलरचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्वाचा आहे. दरम्यान, याआधी पंतप्रधान मोदींना अमेरिका, फ्रान्स, इजिप्त, पापुआ न्यू गिनी, फिजी, पलाऊ, भूतान, रशिया, मालदिव, यूएई, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया आदी देशांकडून सर्वोच्च सन्मान देत गौरविण्यात आले आहे. कुवेतने दिलेला सन्मान २० वा आंतरराष्ट्रीय सन्मान ठरला आहे.