ग्रामाडो : वृत्तसंस्था
ब्राझीलच्या ग्रामाडो शहरात रविवारी एक छोटे प्रवासी विमान कोसळले. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, विमान प्रथम एका इमारतीच्या चिमणीला धडकले आणि त्याच इमारतीच्या दुस-या मजल्यावर कोसळले. यानंतर जवळच असलेल्या फर्निचरच्या दुकानात भीषण अपघात झाला. एरिया गव्हर्नर एडुआर्डो लेइट यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी राज्य संरक्षण दलांसह ग्रामाडो येथे विमान अपघाताच्या ठिकाणी भेट दिली. आपत्कालीन दल सध्या घटनास्थळी बचाव कार्यात गुंतले आहे.
स्थानिक मीडियानुसार, विमान पाइपर चेयेन ४०० टर्बोप्रॉप होते. ग्रामाडोहून कॅनेला शहराकडे उड्डाण केले. ते ख्रिसमससाठी फ्लोरियानोपोलिस या प्रसिद्ध पर्यटनस्थळी जात होता. ग्रामाडो हे दक्षिण ब्राझीलमधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, जे जर्मन वास्तुविशारद आणि सुंदर टेकड्यांसाठी ओळखले जाते. ख्रिसमसमुळे या शहरात उत्साह वाढला आहे. जगाच्या कानाकोप-यातून पर्यटक येत असतात.
ब्राझीलमध्ये दोन दिवसांत दुसरी मोठी दुर्घटना
ब्राझीलमध्ये दोन दिवसांतील ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. याआधी शनिवारी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यात बस अपघातात ३८ जणांचा मृत्यू झाला होता, तर १३ जण जखमी झाले होते. ही बस साओ पाउलोहून निघाली होती आणि त्यात ४५ प्रवासी होते. या अपघातात एका कारचीही बसला धडक बसली, मात्र त्यात प्रवास करणारे तिघे सुखरूप बचावले.