परभणी/ प्रतिनिधी
परभणी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विधानसभा सभागृहात मुख्यमंत्र्यांनी खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिली. या विरोधात काँग्रेसकडून मु्ख्यमंर्त्याच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
परभणी येथील स्व. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटूबियांचे सांत्वन करण्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे परभणीत आले असता ते प्रचारमाध्यमांशी बोलत होते. पुढे ते म्हणाले की, खा. राहुल गांधी यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर हे राजकीय नाटक असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक खरी परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही आज परभणीत आलो आहोत. स्व.सोमनाथ सुर्यवंशीला पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. परंतु विधानसभा सभागृहात मुख्यमंर्त्यांनी स्व. सुर्यवंशीला दम्याची बिमारी होती म्हणून त्याचा मृत्यू झाला.
अशी खोटी व सभागृहाची दिशाभूल करणारी माहिती दिली. या विरोधात काँग्रेस मुख्यमंर्त्यांवर हक्कभंग आणणार असल्याचे ते म्हणाले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी हे लोकसभेत वास्तविकता मांडतील व सरकारचे पितळ उघडे करतील. सरकार ठरवून मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करीत असून आम्ही लोकशाही पध्दतीने या विरोधात आवाज उठवू असे सांगत. काँग्रेस पक्ष हा सुर्यवंशी यांच्या कुटूंबियांशी पाठीशी खंबीरपणे उभा असून जो पर्यंत या घटनेतील दोषीवर कारवाई होणार नाही तो पर्यंत शांत बसणार नसल्याचे ते म्हणाले.